नाशिक Ajit Pawar in Nashik : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. अजित पवार नाशिकमध्ये पोहोचल्यावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं ठिकठिकाणी मोठ-मोठे हार घालून जंगी स्वागत करण्यात आलं. तसंच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी येथील सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे तसंच राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. अजित पवार यांनी सप्तशृंगी गडावर होत असलेल्या कामाबाबत माहिती घेतली. सप्तशृंगी देवीच्या वतीनं पवारांना सप्तशृंगी देवीची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.
नवरात्रात मंदिर 24 तास खुले राहणार : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत असते. या नऊ दिवसाच्या काळात लाखो भाविक देवीच्या चरणी लीन होतात. दरम्यान, या कालावधीत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सप्तशृंगीगड येथे सप्तशृंगी देवीचे दर्शन 24 तास सुरू राहणार आहे. विश्वस्त संस्थेने श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत दर्शनासाठी 24 तास खुले ठेवून भाविकांना श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून दिलीय. तसंच यंदा दररोज 50 ते 60 हजार भाविक दर्शनासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
खासगी वाहनांना गडावर बंदी : दरवर्षी नवरात्रीत सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या पालख्या, भाविक, यामुळे गडावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सप्तशृंगी देवी मंदिर हे 24 तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. तसंच नवरात्रोत्सव काळात खासगी वाहनांना गडावर बंदी असणार आहे. तसंच नांदुरीगड पायथ्याशी बसस्थानक व वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या काळात कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी गड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ : दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचा पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडतो. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केलं. लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की, राम-रावण युद्धात इंद्रजीताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडले. तेव्हा हनुमानाने द्रोणागिरी पर्वत नेला. त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच सप्तशृंगी गड म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे अनेक पौराणिक उल्लेख सापडतात. तसंच सुरत लुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनासाठी आल्याचा संदर्भही इतिहासात आढळतो.
हेही वाचा -
- Ajit Pawar in Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर; वाहनासमोर टोमॅटो-कांदे फेकून शेतकऱ्यांनी केला निषेध
- Saptshringi Mata temple Nashik : सप्तशृंगी मातेच्या मंदिराचे पालटणार रूप, 'या' तारखेपासून कामास होणार शुभारंभ; पाहा व्हिडिओ
- नाशिक...म्हणून 45 दिवस वणी सप्तशृंगी मातेचे मंदिर राहणार बंद