मालेगाव (नाशिक) - शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून सर्व बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ पिककर्ज उपलब्ध करून द्यावे. नियमित कर्जाची परतफेड करणारा एकही शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज (दि. 12 सप्टें.) दिले आहेत.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पिककर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे व सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंत्री भुसे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते एनपीए झाले आहेत, अशा खातेधारकांबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन त्यांना अधिकाधिक मदत कशी देता येईल, यासाठी सर्व बँकांनी पाठपुरावा करावा. शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने सुमारे 915 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी शेतकऱ्यांना पिककर्जासाठी वापरून शेतकऱ्यांना सक्षम व समृद्ध करण्यासाठी सर्व बँकांचे सहकार्य अपेक्षित असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पिककर्जापोटी मालेगाव तालुक्याची एकूण 90 कोटींची मागणी लक्षात घेता विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्हा बँकेसह विविध राष्ट्रीयकृत बँकांचा आढावा घेताना मंत्री भुसे यांनी आजतागायत झालेल्या पिककर्ज वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, आजपर्यंत पिककर्ज वाटपाच्या अनुषंगाने चार बैठका होऊनही पिककर्ज वाटपामध्ये अपेक्षित लक्षांक पूर्ण होताना दिसत नसेल तर, कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा बँकेला सोमवारची मुदत
जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना वितरीत होणारी पिक कर्जाची रक्कम अपेक्षीत लक्षांकापेक्षा खुप कमी आहे. याची गंभीर दखल कृषीमंत्र्यांनी घेतली असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची एकूण 122 कोटी रकमेपैकी केवळ 22 कोटीचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. तालुक्याची पीककर्जापोटी 90 कोटीची मागणी असताना अत्यल्प प्रमाणात पीक कर्जाचे वाटप झाले असून येत्या सोमवारपर्यंत तालुक्याचा संपूर्ण लक्षांक पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री भुसे यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा बँकेसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांकडून पीक कर्जवाटपाचा आढावा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला.
हेही वाचा - नाशिकच्या विनायकने घातली तंत्रज्ञान आणि खेळाची सांगड; बुद्धिबळ शिका आता मराठीतून...