मनमाड (नाशिक) - केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी सोमवारी हटविल्यानंतर मनमाडसह नांदगाव मालेगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात सुधारणा झाली. कांद्याचे भाव आणखीन वाढतील, अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांना किती फायदा होईल, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. हीच निर्यात 2 महिने अगोदर खुली केली असती तर कदाचित याचा फायदा झाला असता, अशी भावना शेतकरीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. निर्यात बंदी काढल्याने कांद्याला प्रति क्विंटल ३ ते ४ हजार रुपये भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
हेही वाचा-डिश टिव्हीला 4,164 कोटी रुपये भरण्याची केंद्राकडून नोटीसकेंद्राकडून कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध रद्द
शेतकरी आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न.....!
निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना आज फायदा मिळणार नाही. बाजारामध्ये कांद्याची आवक वाढत आहे. केंद्र सरकारने जर दोन महिन्यांपूर्वी निर्यात बंदी उठविली असती तर नक्कीच बळीराजा सुखावला असता. कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने निर्यात बंदीचे उचलले पाऊल शेतकरी हिताचे नव्हते. शेतकऱ्यांना आंदोलनापासून भरकटवण्याचा प्रयत्न तर सरकारने केला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खासदार भारती पवार यांचा पाठपुरावा....
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त कांदा पिकाचे उत्पन्न घेण्यात येते. यामुळे कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी खासदार भारती पवार यांनी सतत पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी 1 जानेवारीपासून निर्यात खुली करणार असल्याचे पत्र खासदार पवार यांना सोमवारी संध्याकाळी दिले आहे.
कांद्याचे दर प्रति किलो १०० रुपयांपर्यंत पोहोचले होते..
महाराष्ट्र, कर्नाटक या कांदा उत्पादक राज्यांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले. बाजारपेठेत कांद्याची आवक न झाल्याने कांद्याचे दर देशातील अनेक शहरांमध्ये प्रति किलो १०० रुपयापर्यंत पोहोचले होते. कांद्याची बाजारपेठेत आवक वाढण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदी व कांदा साठवणुकीवर निर्बंध असे उपाय केले होते.