नाशिक - जिल्ह्यातील मालेगाव येथे गोकुळाष्टमीनिमित्त मालेगावच्या कलाकारांनी एकत्र येत श्रीकृष्ण जन्माचा देखावा असलेली अतिशय सुंदर रांगोळी काढली आहे. तब्बल ७२ तासाच्या परिश्रमानंतर ही रांगोळी साकारण्यात आली.
१०×१५ फूट आकाराची रांगोळी, पिगमेंट, लेक रंगांचा वापर -
गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून मालेगाव येथे साई आर्ट संस्थेचे प्रमोद आर्वी व त्याच्या सहकलाकारांनी आज 'श्रीकृष्णाच्या बालछटा' असलेली अप्रतिम अशी रांगोळी साकारली आहे. १०×१५ फूट आकाराची ही रांगोळी साकारण्यासाठी या कलाकारांना तब्बल ७२ तास दिवस रात्र मेहनत घ्यावी लागली आहे. या रांगोळीत विशेष म्हणजे यात पिगमेंट व लेक रंगांचे मिश्रण करण्यात आले असून हे रंग सांगली, पुणे, मुंबई याठिकाणी मिळत असतात.
२७ किलो रांगोळीचा यात वापर करण्यात आला आहे. सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी आदी सर्वच कार्यक्रमांच्या निमित्ताने मालेगावचे हे कलाकार विशेष अशी रांगोळी साकारत त्या माध्यमातून महापुरुष व त्यांच्या कार्यांना उजाळा देत असतात. मालेगावमध्ये अशाप्रकारे रांगोळी साकारल्याने साई आर्ट संस्थेच्या सर्व कलाकार व शिक्षकांचे कौतुक होत आहे.