नाशिक - कोरोनाबाधितांकडून जास्त बिलांची आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांना शासनाने दणका दिला आहे. ज्या रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम रुग्णांकडून घेतली आहे, ती रक्कम या रुग्णालयांकडून परत घेतली जाणार आहे. नाशिक महानगरपालिकेनेही अशा रुग्णालयांची यादी तयार करून अतिरिक्त पैसे पुन्हा वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे.
राज्य सरकारने खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णानां आर्थिक दिलासा मिळावा यासाठी १३ मार्च २०२० ला साथरोग प्रतिबंधक कायद्याखाली स्वतंत्र अधिसूचना काढली होती. यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना उपचाराच्या खर्चाचे एक दर पत्रक निश्चित करून दिले होते. मात्र, राज्यभरातील अनेक खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांकडून निश्चित करून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त बिल वसूल केले. याबाबत शासनाकडे अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. रुग्णांकडून घेतलेले अतिरिक्त बिल पुन्हा वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी शासनाने राज्यातील सर्वच महानगरपालिकांना तशा सुचना देखील दिल्या आहेत.
राज्य सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. या शिवाय ज्या खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांची लूट झाली होती, अशा रुग्णांनाही या निर्णयामुळे न्याय मिळाला आहे. जी रुग्णालये पुढील काळात शासनाने ठरवून दिलेल्या दर पत्रकाप्रमाणे बिल आकारणी करणार नाहीत, अशा रुग्णालयांना शासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.