नाशिक - तीन वर्षांपूर्वी सातपूर येथे दोघा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. या हत्येसाठी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. आरोपी रामदास शिंदे याला पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले आहे.
सातपूर येथील पल्लवी संसारे (वय ३६) आणि त्याचा मुलगा विशाल संसारे (वय ६) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. मृत पल्लवी यांचे पती कचरू संसारे यांनी रामदास शिंदे याने हत्या केल्याचा आरोप केला होता. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे रामदास शिंदे याला २६ एप्रिल २०१८ ला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर वकील अनिकेत निकम यांनी शिंदे याची केस हाती घेतली.
निकम यांनी न्यायालयात युक्तीवाद केला, की मोबाईल कॉलच्या द्वारे केलेला अतिरिक्त न्यायीक कबुलीजबाब हा पुरावा आरोपीला फाशी देण्याइतका सबळ नाही. या कॉलची स्पेक्टोग्राफीक टेस्ट करताना झालेल्या संभाषणाचा लिखित पंचनामा झाला नाही. तसेच, हा कॉल १८ एप्रिल २०१६ ला मोबाईलमधून पेन ड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करण्यात आला. पण, मोबाईल १ मे २०१६ ला जप्त केला गेला. तेव्हा हा पुरावाच संशयास्पद आहे, असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले.
तसेच, आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली हत्यारे, कपडे, चावी एका कॅरीबॅगमध्ये जप्त करण्यात आली. पण, ही कॅरीबॅग न्यायालयापुढे सादर करण्यात आली नाही. त्यामुळे हा पुरावा सुद्धा संशयास्पद आहे. तसेच, इतर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा युक्तीवाद निकम यांनी केला.
दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपिठाच्या न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी आरोपी रामदास शिंदे याची दुहेरी हत्याकांडातून निर्दोष मुक्तता केली.