नाशिक - जिल्ह्यातील निफाड न्यायालयाच्या आवारातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपीने पलायन केल्याची धक्कादायक घटना आज घडली. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.
तालुक्यातील नैताळे येथे वास्तव्यास असलेला श्रावण सुरेश पिंगळे (वय २२) याच्यावर निफाडसह विविध पोलीस स्थानकात गंभीर गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज त्याला अन्य एका गुन्ह्यांमध्ये मध्यवर्ती कारागृह पोलिसांनी निफाड न्यायालयात आणले होते.
न्यायालयाच्या आवारात असतानाच आरोपीने पोलिसांच्या हाताला हिसका देत बेडीसह पलायन केले. काही कळायच्या आत आरोपीने वडांगळीच्या दिशेने पळ काढला. आरोपीच्या हातात बेडी असून अंगात टी- शर्ट आणि राखाडी रंगाची पँट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. संबंधित फरार आरोपी दिसल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आव्हान, पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.