नाशिक - दिंडोरी तालुक्यात नाशिक पेठ रस्त्यावर सकाळच्या दरम्यान ग्रामस्थांनी जनावरे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पकडले. मात्र, वाहनचालक घटनास्थळावरून पळण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित टेम्पो ताब्यात घेतला. तसेच जनावरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी वाहनचालक आणि त्याच्या साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पळून जाणाऱ्या वाहनचालकाचे नाव अब्दुल्ला शेख, तर त्याच्या सोबत्याचे नाव मिराज उर्फ खतीब शेख असून ते दोघेही अहमदनगरमधील निबाला संगमनेर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
दिंडोरी तालुक्यातील नाशिक पेठ रस्त्यावर उमराळे चौफुलीवरून शुक्रवारी सकाळी ८च्या सुमारास एक टेम्पो (आयसर, एमएच १७ बीडी ५४१६) ११ गायी आणि ३ गुरं घेऊन जात होता. ही बाब येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी सबंधित वाहनचालकास गाडी थांबविण्यास सांगितले. यावेळी चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगाने राशेगावकडे पळवली. ग्रामस्थांना या टेम्पोला रोखण्यात यश आले. मात्र, गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टर पिकाचे नुकसान, विमा कंपन्यांना सहकार्य करण्याचे निर्देश
याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याला दूरध्वनीवरून माहिती दिल्यानंतर दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, हवालदार धनंजय शिलावटे यांनी हा टेम्पो ताब्यात घेतला. यावेळी संबंधित जनावरे ही वलसाड गुजरात येथून संगमनेरला नेली जात असल्याचे गाडीचा क्लीनर खतीब शेख याने सांगितले. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा - धक्कादायक! बहिणीच्या मृतदेहाजवळ ती होती 11 दिवस बसून..
याप्रकरणी संगमनेर येथील संशयित मिराज उर्फ खतीब शेख, अब्दुल्ला शेख या दोघांवर जनावरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या