नाशिक - नाशिकच्या सिन्नर तालुक्यात मांजरीची शिकार करत असताना बिबट्यासह मांजरही थेट विहिरीत पडल्याची घटना घडली. दरम्यान, वनविभागाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी वन विभागातील काही अधिकारी दाखल होत त्यांनी यशस्वीरीत्या मांजर आणि बिबट्याला बाहेर काढले.
डरकाळीचा आवाज आला
सिन्नर येथील कनकाेरी गावातील वाळीबा पुंजा सांगळे यांची विहिर आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वस्तीवर राहणारे सुकदेव बुचकुल हे विहिरीवरील विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना डरकाळीचा आवाज आला. त्यांनी विहिरीत पाहिले तर बिबट्या आणि मांजरे विहिरीत दिसले. विहिरीच्या कपारीला बिबट्या बसलेला होता. त्यानंतर बुचकुल यांनी शेतमालक गणेश सांगळे व माजी उपसरपंच रामनाथ सांगळे यांना माहिती दिली. सांगळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवताच वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे, सुधीर बोकडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने दुपारी अकरा वाजेच्या सुमारास विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला सुखरुप विहिरीच्या बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. हा बिबट्या पाच ते साडेपाच वर्षांचा असून, तो नर जातीचा आहे.
रात्रभर दोघांचा मुक्काम विहिरीतच
सांगळे यांची ५० फूट विहीर असून त्यामध्ये २८ फुटांपर्यंत पाणी आहे. पाण्याच्या वरतीच विहिरीची कपार असल्याने बिबट्या कपारीचा आडोसा घेत होता. विहिरीला वरच्या बाजूने कठडा नसल्याने बिबट्या विहिरीत पडला. वनविभागाचे पंधरा ते वीस कर्मचाऱ्यांनी तब्बल आठ तासाच्या परिश्रमानंतर बिबट्याला बाहेर काढले. विहिरीचा अंदाज न आल्याने व मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या व मांजर हे दोघेही विहिरीत पडले. रात्रभर दोघांचा मुक्काम विहिरीतच होता. दरम्यान, दोघांनी परस्परविरोधी बाजूला कपारीचा आधार घेतला. बिबट्याला काढल्यानंतर क्रेनद्वारे एका युवकाला विहिरीत पाठवून मांजरालाही बाहेर काढण्यात आले.