नाशिक : नाशिकरोड येथील जेलरोड परिसरातील एका खाजगी शाळा आहे. या शाळेत काही विद्यार्थी मस्ती करत असल्याने त्यांना प्राचार्यांनी जाब विचारत काठीने बेदम मारहाण केली. त्यामुळे विद्यार्थी घाबरून गेले आहेत. विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं समजताच त्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन जाब विचारला, यावेळी पालक आणि प्राचार्यांमध्ये चांगलाच वाद झाला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. याबाबत उपनगर पोलिसात परस्परविरोधी अदाखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आम्हाला काठीने मारले : आम्ही मित्र वर्गात मस्ती करत होतो. यावेळी प्राचार्य वर्गात काठी घेऊन आल्या त्यांनी आम्हाला काठीने बेदम मारहाण केली. तोंडावर बुके मारले. जातीचाचक शिव्या दिल्या ही माहिती आम्ही घरच्यांना दिल्यावर आमचे पालक शाळेत आले. त्यांनी प्राचार्यांना विचारले मात्र त्यांना देखील शिवीगाळ करून हाकलून दिले.
मुलगा चक्कर येऊन पडला : शाळेतील प्राचार्य महिला नेहमीच मुलांना मारहाण करत करतात. मस्ती करतो म्हणून त्यांनी माझ्या मुलाला बेदम मारहाण केली. तो शाळेतून घरी येताना रस्त्यात चक्कर येऊन पडला. त्याला मित्रांनी घरी सोडले. याबाबत आम्ही शाळेत प्राचार्यांना जाब विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करून तुमच्या मुलाला शाळेतून काढून टाकू. त्याचे नुकसान करू आशा धमक्या दिल्या आता आम्ही पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या आधी देखील मारहाण : या शाळेच्या प्राचार्याने मागील वर्षी देखील मुलांना मारहाण केले होते. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. मात्र, तरीसुद्धा हे प्रकार अजूनही सुरूच आहेत. त्यांच्या विरोधात बोललं तर ते मुलांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी देतात. माझा मुलगा नववी मध्ये शिकत आहे. पुढे दहावीच वर्ष असल्यामुळे आम्ही नाईलाजाने त्यांना या शाळेत ठेवले आहे.
अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन : या खाजगी शाळेबाबत याआधीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून, येथील प्राचार्य महिलेकडून विद्यार्थ्यांना नेहमीच मारहाण केली जाते. वर्षभरात ही दुसरी घटना घडली असून, पोलिसांनी या प्राचार्य महिलेला समज द्यावी अन्यथा आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करू असं मनसेच्या महिला शहराध्यक्ष अक्षरा घोडके यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : Ashish Shelar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना हिंदूंबाबत इतकी चीड का? आशिष शेलारांचा घणाघात