नाशिक - अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या 'निसर्ग' चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहू लागले. शहर व परिसराला निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोसाट्याचा वारा व जोरदार पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे नाशिकच्या भद्रकाली परिसरातील पिंपळ चौकातील 100 वर्ष जुना वाडा कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाड्याच्या खाली उभे असलेल्या वाहनाचे नुकसान झाले आहे.
पावसाळा सुरू होताच शहरातील जुने वाडे कोसळतात. शहरात जुने वाडे जास्त असल्यामुळे हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येतो. त्यामुळे खबरदारी बाळगत महानगर पालिकेने अशा जुन्या वाड्यांचा सर्व्हे केला पाहिजे. सर्व्हेनुसार जे वाडे पडण्याच्या स्थितीत असतील ते पाडले पाहिजे. म्हणजे, कोणतीही हानी होणार नाही, अशी मागणी स्थानिक नागरिकानी केली आहे. मागच्या वर्षी देखील नाशिक शहरातील 14 जुने वाडे हे पावसामुळे कोसळले होते.