दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यात लॉकडाऊन सुरू झाल्याच्या महिनाभरानंतर मुंबईहून आलेली व्यक्ती पहिली कोरोनाबाधित सापडली होती. यानंतर निळवंडी, मोहाडी, दिंडोरी शहर असे मिळून एकून ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यानंतर लालुका रेड झोनमध्ये आला होता. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना गृहविलगीकरणात राहण्यास सांगितले आहे.
संपूर्ण जिल्हा रेड झोनमध्ये असताना दिंडोरी तालुक्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महिनाभर एकही कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळला नव्हता. परंतु, मुंबईहून आपल्या गावी इंदोरे येथे आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडली. हा पहिला रुग्ण आढळल्यानंतर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. यानंतर जिल्हास्तरावरून येणाऱ्या सूचनाचे पालन करत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशीरे यांनी कोरोनाबाधितांची शोधमोहीम सुरू केली. तालुक्यातील दहा आरोग्य केंद्रे आणि आशा सेविकांच्या मार्फत डोअर टू डोअर पाहणी केली. बाहेर गावाहून आलेल्या चाकरमान्यांची माहिती संकलित करण्यात आली. तसेच, कडक संचारबंदीही पाळण्यात आली.
यानंतर तालुक्यात आतापर्यंत तरी आणखी रुग्ण आढळलेले नाहीत. शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण मोहाडी व इंदोरे येथे आढळून आला होता. या दोन्ही गावांतील कन्टेन्मेंट झोन १२ जूनपर्यंत संपतील. तेथे आणखी नवीन रुग्ण न आढळल्यास दिंडोरी तालुका कोरोनामुक्त म्हणून जाहीर करता येऊ शकेल, असे डॉ. सुजित कोशीरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.