नाशिक : आर्थिक आणि कौटुंबिक संघर्ष तसेच प्रेमात नकार मिळणे, प्रेमभंग होण्याच्या कारणातून तसेच जीवनात येणाऱ्या नैराश्यामुळे आपल्या सुंदर जीवनाचा त्याग करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रेमात अपयश आलेल्या अनेकांनी राहत्या घरातच गळपास घेऊन स्वतःचे जीवन संपवतात. काही जण एकमेकांच्या साथीने अज्ञात ठिकाणी पाण्यात उडी मारून आत्महत्या करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. काहीजण विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवतात. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकत असताना एकदा तरी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे निदर्शनास येते.
आत्महत्यांची कारणे : प्रामुख्याने प्रेमात नकार मिळणे, प्रेमभंग होण्याच्या कारणातून अनेक जण आत्महत्या करत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर आत्महत्या करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आढळून येणाऱ्या कारणांमध्ये आर्थिक आणि कौटुंबिक संघर्षाचे कारण मुख्य आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या युगात मागे पडण्याच्या भीतीतून निर्माण होणारे नैराश्य हेसुद्धा आत्महत्येचे मोठे कारण आहे. नैराश्य हा आजच्या युगात भयानक मोठा आजार होत आहे. तरुण पिढी मोठ्या प्रमाणात नैराश्यात सापडत आहे. समाजात वावरताना 16 ते 45 या वयोगटातील अनेक तरुण आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. मानसोपचार तज्ज्ञ अशा व्यक्तींची मानसिक अवस्था समजून घेऊन त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवू शकतात, त्यामुळे अनेकांचा जीवन वाचविला जाऊ शकतो.
कोणत्या महिन्यात आत्महत्या केली : जानेवारी 24, फेब्रुवारी 39, मार्च 48, एप्रिल 38, मे 40, जून 39, जुलै 38, ऑगस्ट 39, सप्टेंबर 26, ऑक्टोबर 29, नोव्हेंबर 35, डिसेंबर 42..
मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या : इंटरनेटच्या आभासी दुनियेत जगण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यक्तीच्या संपर्कात राहून काम करावे. त्यातून बहुतेक मानसिक ताण कमी होतो. कोरोना काळात सर्वच जग आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे आपण पण संकटाला तोड देऊ शकतो, असा विचार मनात ठेवा. प्रेमप्रकरण किंवा आर्थिक अडचणीमुळे नैराश्य आल्यास आपण आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र यांचा सल्ला घ्यावा. आत्महत्यासारखे विचार येत असतील तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळेल, असे मानसोपचार तज्ज्ञ हेमंत सोननीस यांनी सांगितले.