नाशिक - दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे ४१ जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. गावातील व तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जानोरी गावातील ४१ व्यक्ती पंढरपूर यात्रेला गेल्या होत्या (१४ डिसेंबर). पंढरपूर येथून त्या सर्व व्यक्ती जानोरी गावात परत आल्या आहेत. त्या सर्वच व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह़ आढळल्या आहेत.
या प्रकारामुळे ग्रामंपचायतने गावातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कामा व्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू नये, महत्त्वाचे काम असल्यास तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा, दोन व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन करावे, घरी परत आल्यावर हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा सर्वांनी वापर करावा, आपल्या गावात कोविडचे नविन रुग्ण तयार होणार नाहीत, याची प्रत्येकाने काळजी घ्यावे, असे आवाहन ग्रामपंचाय प्रशासनाने केले आहे.
परिसरात मोठया प्रमाणात चर्चा व नागरिक सावधान -
गेल्या आठवड्यात करंजवण व कसबेवणी येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले होते. आता पुन्हा एकाच गावात ४१ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. याची तालुकाभर मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे. त्यामुळे आता नागरिकही सावधान झाले आहेत. तालुक्यात प्रत्येक गावातील नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करावे. आपली व इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजितकोशीरे यांनी केले आहे.
प्रशासनाचे धाबे दणाणले -
दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात करंजवण व कसबेवणी येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले होते. आता पुन्हा एकाच गावात ४१ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि तालुका प्रशासनाने धाबे दणाणले आहेत.