नाशिक : सरकारचा महसूल सप्ताह सुरू असतानाच नाशिकचे तहसीलदार नरेश बहिरम (रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक ) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडत अटक केली होती त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात 40 तोळे सोने, 20 तोळे चांदी 4 लाख 80 हजाराची रोकड तसेच नाशिक शहरात विविध भागात प्लॉट, जमिनी आणि विविध बँकांमधील लॉकर्सची माहिती हाती लागली आहे.
पुढील दोन दिवसात या लॉकरची तपासणी केली जाणार असल्याचेही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले आहे. बहिरम याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. लाचलाचखोर तहसीलदार नरेश बहिरम गेल्या 19 वर्षापासून शासकीय सेवेत आहेत. त्यांना एक लाखावर पगार आहे. सरकारचा महसूल सप्ताह सुरू असतानाच तो लाच घेताना सापडला आहे.
महामार्गा ला लागून राजूर बहुला येथे एक जमिनीमध्ये अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केले जात होते. यावर नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्व धन जागेभाडे मिळून एकूण 1 कोटी 25 लाख 6 हजार 220 रुपये दंडाची नोटीस तहसील कार्यालयाने जागा मालकाला दिली होती. या आदेशाविरुद्ध त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील केले. त्यामुळे हे प्रकरण चौकशीसाठी बहिरम यांच्याकडे आले होते. दंड कमी करण्यासाठी बहिरमने जागा मालकाच्या प्रतिनिधीकडे 25 लाखांची मागणी केली.तडजोडीअंती दोघांमध्ये 15 लाख रक्कम निश्चित झाली.
मात्र तक्रारदाराने या बाबतीत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने सापळा रचला. आणि तहसीलदार नरेश बहिरम याला कर्मयोगी नगर येथील त्यांच्या घराच्या पार्किंग मधेच लाच घेताना रंगेहात पकडले. गेल्या काहि दिवसात नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अनेक भ्रष्ट अधिकारी सापडले आहेत. इथल्या लाचखोरीचा विषय पावसाळी अधिवेशनातपण गाजला होता. या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.
उपाधीक्षक नरेंद्र पवार,निरीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून लाचखोर बहिरमला अटक करण्यात आली होती. कोट्यावधीची मालमत्ता उघड होण्याची शक्यताबहिरमच्या घरात काही संशयास्पद कागदपत्रे लाच लुचपत पथकाच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे, यामध्ये नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी केलेले फ्लॅट,जमिनी या कागदपत्रांचा समावेश आहे,तसेच बँकखाते, बँक लॉकर याची देखील माहिती मिळाली असून यात काही घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :