नाशिक - ऐन वाढदिवसाच्या दिवशीच पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अवधूत सचिन वाघ (वय ३) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे चिमुकल्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा -
शहरातील नाशिक रोड, विहितगाव लॅमरोड, महाराजा बस स्टॉपजवळील बंगल्यात वाघ कुटुंब राहते. या कुटुंबातील प्रमुख सचिन वाघ हे भिवंडी येथील महावितरण कंपनीत कामास आहे. त्यांचा 3 वर्षांचा एकुलता एक मुलगा अवधूत याचा नवरात्रीच्या पहिल्या माळेला वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. ते राहत असलेल्या बंगल्याच्या आवारात पाण्याची टाकी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ही टाकी उघडी होती. आणि याच ठिकाणी अवधूत खेळता खेळता तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडला.
हेही वाचा -
ही बाब लक्षात येताच त्याला त्वरित टाकी बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याची गंभीर स्थिती पाहून त्याला बिटको रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.