नाशिक - मालेगाव तालुक्यातील चिखलहोळ शिवारात मृतदेह आढळला होता. आरोपींनी खून करुन पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. या खून पआकरणाचा उलगडा बसच्या तिकाटावरुन झाला. पोलिसांनी या प्रकरणी तीघांना ताब्यात घेतले असून २ आरोपी फरार आहेत.
चिखलहोळ शिवारात ४ मार्च २०१९ रोजी ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात पुरुषाचे प्रेत आढळले होते. खून केल्यानंतर त्याचे पुरावे नष्ट करून प्रेत महामार्गावर टाकले होते. मृतदेहाच्या चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून घटनास्थळी असलेले वाळलेले गवत पेटवून प्रेतास जाळण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांनी हे प्रेत महामार्गावर दिसतात मालेगाव पोलिसांना याची माहिती दिली.
घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता मृताच्या पॅन्टच्या खिशात दोंडाईचा ते धुळे असे बसचे तिकीट सापडले. मृताच्या खिशातील बस तिकिटावरून स्थानिक गुन्हे पथकाने धुळे जिल्ह्यात धाव घेतली. मृताच्या वयाशी साम्य असलेल्या हरवलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यासाठी धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील व्यक्तींची पडताळणी केली. धुळे स्टँड परिसरात त्याचे फोटो देखील लावण्यात आले. मृत व्यक्ती हा धुळे ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये काम करत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून चौकशी केली असता मृत व्यक्ती हा महेंद्र काशिनाथ परदेशी (रा. शनी नगर धुळे) असल्याचे निष्पन्न झाले.
मृत व्यक्तीची ओळख पटल्यानंतर दैनंदिन जीवनात त्याचे कामकाज काय करायचा आणि कोण मित्र होते ?कोणाशी वैर होते का? याची कसून तपासणी पोलिसांनी केली. मृताचे एका व्यक्तीशी वाद असल्याचे समजले. त्या वरून मृताची पत्नी रूपाली परदेशी हिला ताब्यात घेण्यात आले.
पती महेंद्र परदेशी व रूपाली परदेशी आणि तिचा मित्र कैलास वाघ यांच्यात वाद विवाद झाले होते. महेंद्र परदेशी यांनी आपल्या पत्नीला विचारले की तुझा मित्र कैलास वाघ आपल्या घरी का येतो म्हणून मारहाण केली. त्यावेळी कैलास वाघ हा घरी आला त्याला राग आल्याने महिंद्रचे हात-पाय बांधून लाथाबुक्क्यांनी मारले. बाजूस पडलेली हातोडीने महिंद्राच्या पाठीवर वार केले. यामुळे महिंद्रच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली. थोड्या वेळानी कैलास यांनी महिंद्रची हालचाल होत नसल्याने नाकाजवळ हात लावला तेव्हा त्याला महेंद्र मृत झाल्याची जाणीव झाली. कैलास ने रूपाली परदेशीला कुठेच न जाता घरी झोपून राहा असा सल्ला दिला. कैलासचा मित्र बबलू व त्याचे २ साथीदार यांच्या मदतीने ओमिनी गाडीत मृतदेह ठेवून मालेगाव धुळे हायवेवर विल्हेवाट लावून फेकून देण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली.
या गुन्ह्यात आरोपी रुपाली महेंद्र परदेशी (मृताची पत्नी), कैलास शंभू वाघ मृतहेहाची विल्हेवाट लावायला मदत करणारे मित्र धनेश महादेव चव्हाण उर्फ बबलू यास मालेगाव पोलिसांनी तब्यात घेतले आहे . उर्वरित २ आरोपींचा मालेगाव पोलीस शोध घेत आहे.