नाशिक - हरियाणातील मानसेर येथे अडकलेले ४१९ विद्यार्थ्यांपैकी २५० विद्यार्थी ५ बसेसच्या माध्यमातून हरियाणातून महाराष्ट्राकडे रवाना झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी मानसेर येथील मारुती सुझुकी कंपनीत प्रशिक्षण घेत होते. अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांना सूचना दिल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य आय टी आय निदशेन संघटनेच्या वतीने मानसेर येथे मारुती सुझुकी कंपनीत प्रशिक्षित घेत असलेले महाराष्ट्रातील 419 विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी करण्यात आली होती. यानतंर भुजबळ यांनी तत्काळ राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांना विद्यार्थ्यांना बसेसच्या माध्यमातून आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बुधवारी पहिल्या टप्यात 250 विद्यार्थ्यांचा पहिला समूह 5 बसेस च्या माध्यमातून हरियाणातून महाराष्ट्राकडे निघाला आहे. उर्वरित विद्यार्थी पुन्हा 5 बसेच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणार आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये नाशिक, पुणे, धुळे, यवतमाळ, हिंगोली, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, बुलडाणा, जळगाव येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.