येवला (नाशिक ) - येवल्यात एकाच वेळेस शुक्रवारी 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 164 झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला असून, 101 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर सध्या 51 जण उपचार घेत आहेत.
येवला शहरा पाठोपाठ आता येवल्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढताना दिसून येत आहेत. तालुक्यातील मातुलठाण , नागडे ,देशमाने, सोमठाणा देश अशा गावांमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील जनतेची चिंता वाढली आहे. येवल्यातील पहिली संपर्क साखळी तुटल्यानंतर शहर पूर्वपदावर येत असतानाच नागरिकांच्या बेफिकिरीमुळे मागील आठवड्यापासून कोरोनाचे पूर्ण संकट गडद होऊ लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
विनाकारण नागरिक रस्त्यावर, दुकानात, भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडताना दिसत आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाधित क्षेत्र प्रतिबंधित केले असून त्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली होती. सध्या प्रतिबंधक उपाय म्हणून नगरपरिषदेने व्यावसायिकांसाठी सम-विषम हा फॉर्म्युला लागू केला असून तो तसाच राहणार आहेत.