नाशिक - कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने नागरिकांना घरी थांबण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. हॉटेल व खाणावळीही बंद झाल्याने एकटे राहणाऱ्या नागरिकांचे खाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे नाशिकच्या सिडको परिसरातील आर्यवर्त सोसायटी समितीतर्फे दररोज 200 गरजू नागरिकांना जेवण दिले जात आहे.
सध्या लॉकडाउनमुळे मोलमजुरी करणाऱ्यांची सर्व कामे बंद झाली आहेत. जी लोक बेघर आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मदतीचे हात सरसावले आहेत. यामध्ये आर्यावर्त सोसायटी समितीतर्फे जेवणाची पॅकेट बंद करून गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे.
सोसायटीतील सदस्य श्रमदानातून अन्न तयार करून पॅकिंग करतात. तसेच यावेळी स्वच्छतेचे सर्व निकष पाळले जातात. व गर्दीही होऊ दिली जात नाही, असे नाना महाले आणि चेअरमन अशोक खैरनार यांनी सांगितले. तसेच गरजू व्यक्तींनी आर्यावर्त सोसायटीमधील जेवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्यवर्त सोसायटी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.