नाशिक- मालेगावात प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे. अनेक जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात कर्तव्य बजावणारे 170 पोलीस देखील कोरोनामुक्त झाले आहेत. बंदोबस्तात चांगली कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी बक्षीसही जाहीर केले आहे.
मागील दीड महिन्यात मालेगावमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. 800 हून अधिक जण कोरोनाबाधित झाले होते. यात मालेगाव शहरात पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यात तीन पोलिसांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र, समाधानाची बाब म्हणजे 170 पोलीसांनी कोरोनावर मात केली आहे. सुरुवातीला पॉझिटिव्ह आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना एमईटी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तसेच समाजकल्याण वसतिगृह आडगाव येथे क्वारंटाईन केले होते. त्याठिकाणी पोलीस विभागाने त्यांची योग्य ती देखभाल घेत पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रदीप नाईक यांनी सोशल डिस्टनसिंग बाबत मार्गदर्शन केले.
आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले अनेक पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. मालेगावात गेल्या 50 दिवसाहून अधिक काळ कर्तव्य बजावणाऱ्या या कोरोना योद्धाना पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी बक्षीसही जाहीर केलं आहे.