नाशिक- "मला सर खूप आवडतात" मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे', अशी चिठ्ठी लिहून सातवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी शिक्षकाबरोबर पळून गेल्याची धक्कादायक घटना निफाड तालूक्यातील देवपूर येथे समोर आली आहे. याबाबत निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काही तासातच पोलिसांनी मुलीचा शोध घेत संशयित शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
शिकवणी घेत होता शिक्षक-
नाशिकच्या निफाडच्या देवपूर येथील एका कुटुंबातील ही अल्पवयीन मुलगी कुंदेवाडी येथे सातवीच्या वर्गात शिकत होती. इयत्ता दुसरी पासून ती खासगी शिकवणीसाठी शिक्षक पंकज श्याम साळवे या 23 वर्षीय सरांकडे जात होती. दोन दिवसापूर्वी या अल्पवयीन असलेल्या मुलीने आपल्या हस्त अक्षरात "सर मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे",अशी चिठ्ठी लिहून ती घरातून निघून गेल्याची घटना घडली.
शिक्षकाच्या घरालाही कुलूप-
मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिने लिहलेली चिठ्ठी घरात सापडली. मात्र, ती चिठ्ठी वाचून त्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कुठेच सापडली नाही. चिठ्ठीतील उल्लेखाप्रमाणे तिच्या कुटुंबीयांनी शिक्षक पंकज साळवे यांच्या घरी खात्री करण्यासाठी पाहणी केली असता, त्यांच्या घराला कुलूप आढळले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने तातडीने निफाड पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास चक्र फिरवत काही तासातच नाशिकच्या एका ठिकाणाहून मुलीला ताब्यात घेत शिक्षकाला अटक केली.
कोण आहे शिक्षक..
पंकज साळवे हा एका शाळेत हंगामी शिक्षक म्हणून काम करतो. तर देवपूर परिसरात दोन-तीन ठिकाणी खासगी शिकवणी घेण्याचे काम करतो. या शिक्षकाने मुलीबरोबर प्रेम संबंध निर्माण करुन तिला फूस लावून पळवून नेले. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत काही तासातच मुलीला शोधून काढले. नाशिकच्या एका ठिकाणाहून तिला ताब्यात घेत संशयित शिक्षक पंकज साळवेलादेखील अटक केल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली.