सुरगाणा (नाशिक) - ऑनलाईन शिक्षण घेताना मोबाईलला नेटवर्क नसल्याने एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना सुरगाणा तालुक्यातील बुबळी गावात घडली आहे. विपुल पवार, असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानंतर शाळा, महाविद्यालयांकडून विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र, या पध्दतीचा विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना मोबाईल नेटवर्कचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्क शोधण्यासाठी डोंगरावर, झाडावर, टेकडीवर जावे लागत आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील बाबुळी गावात राहणार विपूल पवार हा विद्यार्थी 12 वीत शिकत होता. सध्या कोरोना काळात सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालयाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत डिजिटल शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गावात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने त्याचे शाळेचे तास बुडत होते. यामुळे तो मागील 15 दिवसांपासून तणावात होता. अशात 2 ऑगस्टला मध्यरात्री 1 ते दिड वाजण्याच्या सुमारास विपूलने घराच्या मागच्या बाजूस असलेल्या शेवग्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. विपुल हा अतिशय हुशार मुलगा होता. तसेच शांत स्वभावाचा असल्याने त्यांचा जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. ह्याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक दिवनसिंग वसावे अधिक तपास करत आहे.