नाशिक- अकारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केल्या नाही तर आंदोलनाचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.
कोरोनामुळे राज्यातील अकारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतांना दिला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
कोरोनामुळे सरकारने अद्याप शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होत आहे. दहावीचा निकाल लागून तीन महिने उलटून गेले तरीही अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तसेच प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु होत नसल्याने विद्यार्थ्यांची मानसिकता देखील खराब होते आहे. विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लागल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नाशिकच्या विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. नाशिक विभागात दीड लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले आहेत. मात्र अजुनही अनेक विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने ह्या विद्यार्थींचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे.
मराठा समाज आरक्षणामुळे स्थगिती
दहावीचा निकाल लागून चार महिने झाले आहेत. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळाला नाही. आज मराठा आरक्षणामुळे जर प्रवेश प्रक्रियेस विलंब होत असेल तर याला सरकार जबाबदार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वच विद्यार्थी संघटनांची मागणी आहे मात्र यासाठी सर्वच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य अंधारात घालणे योग्य नसल्याचे विद्यार्थी संघटनानी म्हटले आहे. लवकरात लवकर अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे..