मनमाड (नाशिक) - नांदगाव तालुक्यातील एका गावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीशी तिच्याच चुलत मामेभावाने अनैतिक संबंध ठेवल्याने त्यातून ती मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नांदगाव पोलीस स्थानकात लैंगिक अत्याचार व पोक्सो (POCSO)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्याला अटक करण्यासाठी विशेष पथक पाठवले जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, संबंधित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आजीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. या प्रकरणी आजीने एका नातेसंबंध असलेल्या तरुणाच्या विरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३७६ व बाल लैंगिक अत्याचार कायदा पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हा मजुरीचे काम करत असल्याने सध्या तो लॉकडाऊनमुळे पुणे येथे अडकलेला आहे. संपूर्ण कायदेशीर कारवाई करून विशेष पथक पाठवून त्याला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परशुराम दळवी करीत आहेत.
या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून चुलत मामेभावाने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार केल्याने नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. यामुळे कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही, अशी वेळ आली आहे.