नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची भर पडली असून आज मालेगावमध्ये नव्याने ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११० वर पोहोचली आहे. एकट्या मालेगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ९६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत मालेगावमध्ये कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरातील ११ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, शहरात अद्यापही १० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही.

मालेगावात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीच्या उंबरठयावर जाऊन पोहोचला आहे. नव्याने 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मालेगावात आता कोरोना बधितांचा आकडा ९६ झाला असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण मालेगावात असून प्रशासनाने सर्वाधिक लक्ष मालेगाव येथे केंद्रित केले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले परिसर सील केले असून येथील नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जात आहे. तसेच मालेगावमध्ये येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नाकेबंदी करण्यात आली असून मालेगावातून बाहेर जाण्यास आणि मालेगावात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.