नाशिक - ऑक्सिजन गळती झाल्याने जवळपास अर्धा तास रुग्णांना ऑक्सिजन मिळू न शकल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून 10 लाखांची मदत देण्यात येणार आहे. राज्य सरकारने 5 लाख रुपये मदत देणार असल्याचे सांगितल्यानंतर नाशिक महानगरपालिकेकडूनही 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याची घटना आज घडली. ऑक्सिजन गळती झाल्यामुळे रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला. या घटनेत तब्बल 61 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. तर या दुर्देवी घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये 11 पुरुष आणि 11 स्त्रियांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
वॉल लिकेज झाल्याने ऑक्सिजन गळती
सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच अनेक रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात ऑक्सिजनचा साठा कमी पडत आहेत. मात्र असे असताना दुसरीकडे नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची घटना घडली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टॅंकरमधून ऑक्सिजन वाहिन्यांमध्ये ऑक्सिजन सोडण्यात येत होता. याच वेळी ऑक्सिजन वॉल लिकेज झाल्याने गळती झाली. दरम्यान या घटनेमुळे आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही रुग्ण दगवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.