नंदुरबार - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नवापूर तालुक्यातील विसरवाडी, चिंचपाडा, याठिकाणी महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील शहराच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो. या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
नवापूर ते अमरावती या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी थाटामाटात उद्घाटन करून कामाला सुरुवात केली. परंतु, वर्षभरापासून हे काम रखडलेलेच आहे. नागपूर ते सुरत व्यापाराच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्यावरून रोज हजारो अवजड वाहने जातात. पण, या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अवजड वाहणांना येथून वाहतूक करणे कठीण झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून तसेच अपघातांची संख्याही वाढली आहे. तसेच खड्डेमय रस्तावरून सतत प्रवास करून दुचाकी चालकांना पाठदुखी, मानदुखी सारख्या त्रासाला सामेरे जावे लागत आहे.