नंदुरबार - लग्नानंतर अवघ्या काहीच महिन्यात एचआयव्हीची लागण झाल्यामुळे पतीचे निधन झाले. त्यामुळे त्या दामिनीसही एड्सची लागण झाली. सासरच्या लोकांनी पाठ फिरवली, जवळच्या नातेवाईकांचा पाहण्याचा दुष्टीकोन बदला, समाजही वेगळ्या नजरेने पाहू लागला. वयोवृद्ध बापाने साथ दिली आणि या 'दामिनी'च्या जीवनात एक नवीन पालवी फुटली. आज हीच 'दामिनी' उत्तर महाराष्ट्रातील पाच हजारांपेक्षा अधिक एड्स बाधितांसाठी एक आशेचा किरण ठरली आहे. महिला दिनानिमित्त पाहू या रणरागिणीचा संघर्षमय जीवनावर खास रिपोर्ट...
नंदुरबार शहरापासून आवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भोणे गावातील एका परिवारातील मुलीचा विवाह 2000 मध्ये हतनूर गावात झाला. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत दामिनीच्या (नाव बदललेले) पतीचे एचआयव्हीमुळे निधन झाले. पतीच्या निधनामुळे त्या तरुण वयातच विधवा झाली. पतीपासून दामिनीलाही एड्सची लागण झाली. तिच्या सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांनी दामिनीकडे पाठ फिरवली. मात्र, वडील दामिनीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी एका संस्थेतून तिच्यावर समुपदेशन केले. तिथूनच दामिनीच्या जीवनात बदल झाला. त्यानंतर दामिनीनेही एड्सग्रस्तांसाठी काम करणे सुरू केले. मुलीला समाजातील इतर एड्सबाधितांसाठी कार्य करत असल्याने तिच्या वडिलांना आपल्यावर गर्व असल्याचे तिने सांगितले.
पतीच्या निधनानंतर सासरच्यांनी पाठ फिरवली वडिलांनी घरी आणले. शिवणकाम शिकवले, मात्रनंतर वैद्यकीय तपासणीत तिलाही एड्सची लागण झालेली असल्याचे समोर आले. समुपदेशनासाठी तिला पुण्याला घेऊन गेले. तिथे भेटलेल्या अनेकांच्या व्यथा सारख्या होत्या. त्यातून एड्सबाधितांसाठी काहीतरी केले पाहिजे. या उद्देशाने त्यांनी नंदुरबार येथे एक संस्था उभारली. त्यातून त्या एड्सग्रस्तांसाठी समुपदेशन करणे, उपचारासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरू केले. बाधितांच्या परिवाराकडे जाऊन त्यांच्या मनातील या आजाराबद्दलच्या शंका-कुशंका दूर करण्याचा प्रयत्न करतात.
एड्सची लागण असलेल्या परिवारांना हक्काचे घर मिळावे म्हणून दामिनीने जिल्हापरिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून विविध योजनाची माहिती मिळवली. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाच हजारपेक्षा अधिक एड्सबाधितांसाठी घरकुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगतात. विविध योजनाचा लाभ देत रुग्णांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. त्यांचा डोळ्यात आंनदाश्रू तरळतात आणि हीच आपल्या कामाची पावती असल्याचे दामिनी बोलून दाखविली.
हेही वाचा - महिला दिन विशेष : संसाराचा गाडा हाकण्यासाठी 'तिने' हातात घेतले रिक्षाचे 'स्टेअरिंग'