नंदुरबार- संचारबंदी दरम्यान व्यवसाय बंद झाल्याने देहविक्री करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. या महिलांच्या मदतीला पोलीस प्रशासन धावून आले आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने देहविक्री करणाऱ्या महिलांना किमान ८ दिवस पुरेल इतका शिधावाटप करण्यात आला आहे. त्यांच्या या मदतीमुळे देहविक्री करणाऱ्या महिला भारावून गेल्या आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेतून देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी शिध्याची व्यवस्था केली आहे. एरवी पोलिसांकडून या महिलांवर कारवाई व्हायची. मात्र, संकटसमयी हेच पोलीस मदतीला धावून आल्याने महिला भारावून गेल्या. संचारबंदी आधी या महिला दिवसभरा ३०० ते ४०० रुपयांची कमाई करून आपल्या मुला-बाळांचा उदरनिर्वाह करायच्या. मात्र, संचारबंदी सुरू झाल्यानंतर आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे देहविक्री करणाऱ्या महिलांनी सांगितले आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल देहविक्री करणाऱ्या महिलांनी आभार मानले आहे.
हेही वाचा- संचारबंदी काळात कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी