नंदुरबार- विसरवाडी परिसरात डोंगराळ भागातून पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने सरपणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विसरवाडी गावातील सरपणी नदीत जुन्या बंधाऱ्याच्या भिंतीला पुराचे पाणी लागून नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. ही भिंत काढण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली होती परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत या परिसरातील घरांना मोठा फटका बसला होता. तसेच, आर्थिक नुकसानही झाले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कमी उंचीची आणि निकृष्ट असल्यामुळे नागरिकांना पूरस्थितीला बळी पडावे लागत आहे.