नंदूरबार- गुजरात राज्याची परसबाग म्हणून नंदूरबार जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये भाजीपाला पाठविला जातो. मात्र, दुष्काळी परिस्थतीमुळे जिल्ह्यातील भाजीपाला बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ भाजीपाला विक्रीचे दर वाढले आहेत. भाजीपाला मार्केटमध्ये अजून महिनाभर तेजी राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते. मात्र, या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे भाजीपाला लागवड क्षेत्र कमी झाल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. सध्या बाजारात फळे आणि पालेभाज्यांची आवक कमी आहे. त्यामुळे महिनाभर तरी भाजीपाला मार्केटमध्ये तेजी राहण्याचा अंदाज आहे. परंतु दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्याला व्यापाऱ्यांकडून योग्य भाव मिळत नाही. पिकावर केलेल्या मेहनतीपेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नंदूरबार येथील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होणारा भाजीपाला गुजरात राज्यात जात असतो. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे आवक कमी झाली आहे. दरात वाढ होत असली तरी गवारला पाहिजे तसा भाव मिळत नाही. मात्र, महिनाभर भाजीपाल्यांचे भाव वाढलेले राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. नंदुरबार बाजार समितीतील आवक जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खाली येईल. मात्र, तो पर्यंत सामान्य माणसाला या दरवाढीचा फटका बसणार आहे.
भाजीपाल्याचे ठोक दर
गवार- १५ ते २० रुपये प्रतिकिलो, हिरवी मिरची- ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो, चवळी- ४० ते ५० रुपये प्रतिकिलो, अद्रक-५० ते ६० रुपये प्रतिकिलो, कांदा- ५ ते १० रुपये प्रतिकिलो, फळभाज्या- ४० ते ५० किलो