नंदुरबार - "विठ्ठल माझा माझा, मी विठ्ठलाचा" जयघोषामध्ये संत मंगलदासजी महाराज मंदिर समितीच्यावतीने आज प्रतिपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे वारी मार्गस्थ झाली.
शहादा तालुक्याहून दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहादा तालुक्यातील लोंढरे ते प्रतिपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाळदेकडे भक्तीमय वातावरणात वारी निघाली.
नंदुरबार जिल्ह्यातील लोंढरे येथील वारकरी दरवर्षी या वारीच आयोजन करत असतात. वारीमध्ये आबालवृद्धांसह, महिलांचा, मुलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. यावेळी वारीत सहभागी वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर पावल्या, फुगड्या खेळत आनंदमय वातावरणात प्रस्थान केले. या मंडळाच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून अविरतपणे वारीची परंपरा सुरू असून दोन दिवस पायी चालत हे सर्व वारकरी विठ्ठल चरणी आशीर्वाद घेण्यासाठी जात असल्याचे संयोजकांनी सांगितले.
वारीत सहभागी महिलांनी सांगीतले की, 'बऱ्याच दिवसांपासून वारीची उत्सुकता लागली होती. मात्र, आज तो दिवस उजाडला. वारी जवळ आली की, अंगात उत्साह संचारत असून पांडुरंगाला भेटण्याची आस लागते.' महिला वारकरी बोलत होत्या.