नंदुरबार - सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर खत उपलब्ध करून देऊ अशा घोषणा केल्यात. मात्र, बांधावर तर सोडा दुकानाबाहेर रांगा लावून ही युरिया आणि काही खते मिळत नाही. गेल्या आठवडा भरापासून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी युरिया खतासाठी वणवण फिरत आहेत. गेल्या आठवडा भरापासून युरिया खताची टंचाई आहे. ऐन पिकांना खत देण्याचा काळात खत मिळत नसल्याने पिकांचा वाढीवर आणि उत्पनावर परिणाम होऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात यावर्षी समाधान कारक पाऊस झाल्याने आता पर्यंत 50 टक्के पेक्षा अधिक पेरण्या झाल्या आहेत. 60 टक्के पेक्षा अधिक कापसाची लागवड झाली आहे. पिकांचा उतारा चांगला झाला आहे. आता शेतकऱ्यांची पीक संगोपणासाठी खत देण्याची लगबग आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात खत मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खत वेळेत उपलब्ध झाले नाही तर पिकांच्या वाढीवर आणि उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
खतांचे नियोजन करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. मोठ्या घोषणा झाल्यात मात्र वेळेत खत उपलब्ध व्हावे म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दोन दिवसात जिल्ह्यातील खत टंचाईवर मार्ग काढला नाही तर आंदोलनाचा इशारा भाजपने दिला आहे.
येत्या काही दिवसात जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते उपलब्ध होतील रेल्वे प्रशासनाने रॅक उपलब्ध करून दिल्यावर खते जिल्ह्यात दाखल होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.