नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचबरोबर हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. दोन दिवसांपासून सतत पावसाचा शिडकावा सुरू होता. मात्र रात्री अचानक जोरदार पावसाचे आगमन झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान
हवामानातील बदलामुळे व झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जातो की काय, अशी भीती आता शेतकऱ्यांना सतावत आहे.
सकाळी पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत होत्या, मात्र मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्याने रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहेत. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी, उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे.
गहू पिकांवर परिणाम
वातावरणातील बदलामुळे आणि थंडी कमी असल्याने गहू पिकावर मावा आला आहे. यासोबतच काही भागांमध्ये गहू पिकाला अळीचाही प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच हरभरा, मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सोबतच मर, करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रबी हंगामातील सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यात गहू, हरभरा या पिकांना थंडी आवश्यक असते.
गारपिटीची शक्यता
येत्या काही दिवसात हवामान खात्याने पावसाचा व तसेच गारपिटीचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकरी वर्गाची धाकधूक वाढली असून, त्यांच्या डोक्यात चिंतेचे ढग घोंघावत आहेत. वातावरणातील बदलाने रबी हंगामातील सर्वच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी महागडी औषधांची फवारणी करीत आहेत. मात्र, तरीदेखील सध्याच्या या वातावरणामुळे रबी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकरीवर्गात धास्ती निर्माण झाली आहे.