नंदुरबार - मोबाईल दुकान फोडून महागडे मोबाईल लांबवणार्या दोन चोरट्यांना नंदुरबार एलसीबीने ताब्यात घेतले आहे. हे दोघे आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 70 हजार रुपये किमतीचे 56 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
शहरातील मध्यवर्ती भागातील फोडले होते मोबाईल दुकान -
नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागातील नवशक्ती कॉम्प्लेक्समध्ये सात दिवसांपूर्वी मध्यरात्री चोरट्यांनी संजय मोबाईल दुकान फोडून चोरी केली होती. या दुकानातील नवे व जुने 56 मोबाईल चोरून नेले होते.
गुप्त माहितीच्या आधारे लागला तपास -
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या दोन आरोपींचा शोध घेण्यात आला. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व लपवलेले 4 लाख 70 हजार रुपये किंमतीचे 56 मोबाईल काढून दिले.
दोघे विधी संघर्ष बालक(अल्पवयीन) -
पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणारे दोघे आरोपी विधी संघर्ष बालक आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर भुरट्या चोऱ्या होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे या विधी संघर्ष बालकांची टोळी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या टोळीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी करत आहेत.
'या' पथकाने केली कारवाई -
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, हेड कॉन्स्टेबल प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासुळ, पोलीस शिपाई अभय राजपूत, आनंद मराठे यांच्या पथकाने केली.