नंदुरबार - महाराष्ट्राच्या जंगलातुन पकडलेल्या मांडुळाची तस्करी करणार्या आंतरराज्य टोळीचा नवापूर पोलीस व वनविभागाने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलीसांनी दोन संशयितांना अटक करुन 1 मांडुळ प्रजातीचा साप व अल्टो गाडी असा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी दोघांविरुध्द वन्यजीव अपराध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नवापूर न्यायालयाने दोन्ही संशयितांना 8 जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
मांडूळ तस्करीचे धागेदोरे गुजरात राज्या पर्यंत -
मांडुळ तस्करीचे धागेदोरे गुजरात राज्यापर्यंत असल्याचा संशय असून नवापूर वनविभागाचे पथक गुजरात राज्यात जावुन संशयितांची धरपकड करण्यासाठी शोध मोहिम राबवत आहे. संशयीता कडून अजून विचारपूस केली जात असून यात अन्य कोणाचा समावेश आहे का?, याची माहिती वन विभाग व पोलीस कर्मचारी घेत आहेत.
अघोरी विद्येसाठी वापर -
मांडुळ जातीच्या सापाचा वापर काळी जादु, अघोरी विद्या व गुप्त धन शोधण्यासाठी व सट्टट्यांचे आकडे काढणे अशा विविध प्रकारच्या अंधश्रध्देतुन केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मांडुळ सापाची तस्करी होत असल्याने लाखोंच्या किंमतीत या सापाची विक्री होते.
शिताफीने पोलिसांनी केली अटक -
नवापूरमार्गे गुजरात राज्यात मांडुळ तस्करी होत असल्याची माहिती नवापूर पोलीसांना मिळाली. पोलीसांनी वनविभागाच्या माध्यमातुन सापळा रचुन अल्टो गाडीतुन मांडुळ सापाची तस्करी करणार्या गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील दोघांना शिताफीने पकडले. त्यांच्याकडुन 1 मांडुळ प्रजातीचा साप व वाहन जप्त करण्यात आले आहे. दोन्ही संशयितांसह मांडुळ साप व वाहन असा मुद्देमाल नवापूर वनविभागाकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आल्याची माहिती नवापूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली. याप्रकरणी नवापूर वनपरिक्षेत्र नंदुरबार वनविभाग येथे दोघांविरुध्द वन्यजीव अपराधप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांना न्यायालयात हजर -
दोन्ही संशयितांना नवापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 जानेवारीपर्यंत वनकोठीडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अक्कलकुवा येथे अरमान अब्दुल मजीद मक्राणी यालाही अटक करण्यात आली आहे.
सीमावर्ती भागातून मांडूळाची तस्करी -
महाराष्ट्र-गुजरात राज्यातील सिमावर्ती भागातुन मांडुळ सापाची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महाराष्ट्र की गुजरातच्या जंगलातुन मांडुळ साप पकडुन तस्करी होत आहे की काय? हा देखील संशोधनाचा विषय आहे. या मांडुळ तस्करीचे धागेदोरे गुजरात राज्यापर्यंत असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे वनविभागाने मांडुळ तस्करी करणार्या टोळीचा शोध घेण्यासाठी पथक गुजरात राज्यात पाठवले आहे.
या पथकाने केली कारवाई -
ही कारवाई नवापूर पोलीसांसह धुळे वनसंरक्षक दि.वा.पगार, नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक सुरेश केवटे, धुळे दक्षता विभागीय वनाधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, नवापूरचे वनक्षेत्रपाल आर.बी.पवार यांच्या पथकाने केली.