नंदुरबार - धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गवर धुळ्याहून सुरतकडे भरधाव वेगाने जाणारा मालवाहू ट्रक नवापूर तालुक्यातील पानबारा गावाजवळ हॉटेलमध्ये घुसून अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचा सहचालक व हॉटेलातील दोन जण किरकोळ जखमी झाले असून हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भरधाव ट्रक घुसला हॉटेलमध्ये
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर धुळ्याहून येणाऱ्या ट्रक क्र. एच. आर. 58 बी. 9090 ने पानबारा गावाजवळील रघुनाथ पेट्रोल पंपासमोर महामार्गावर टेम्पोला कट मारली. त्यामुळे ट्रकचालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ट्रक सरळ रस्त्यालगत असलेल्या संजय गावित यांच्या देवमोगरा हॉटेलमध्ये घुसल्याने तिथे काम करणारे पति-पत्नी व ट्रकचा सहचालक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी आपल्या हॉटेलच्या दिशेने ट्रक येत असल्याचे पाहून हॉटेलमधील नागरिकांनी बाहेर पळ काढल्याने मोठी जीवित हानी टळली.
ट्रक चालक झाला पसार
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून वाहन सोडून पसार झाला असून पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा - मोक्का कोर्टाचे आदेश आल्यानंतरच एनसीबीला मिळणार इकबाल कासकरचा ताबा