नंदुरबार - अनेक दिवसांपासून पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये पपईच्या दरावरून वाद सुरू होता. मात्र, अखेर त्याच्यावर तोडगा निघाला असून आता पपईला प्रतिकिलो 11 रुपये 75 पैसे दर देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात पपई तोड सुरू होणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जाते. मात्र, अनेक दिवसांपासून पपईच्या दरावरून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. शेतकऱ्यांच्या पपई फळांना योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पपई न तोडण्याचा निर्णय घेतला होता.
जिल्हा प्रशासनाचा मध्यस्थीनंतर पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी शहादा तहसीलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात पपईला प्रतिकिलो 11 रुपये 75 पैसे दर देण्याचे ठरविण्यात आले आहे. या बैठकीत तोडगा निघाल्याने आजपासून नंदुरबार जिल्ह्यात पपई तोड सुरू होणार असून 11 रुपये 75 पैसे पेक्षा कमी दराने कोणत्याही शेतकऱ्याने आपले पपई विकू नये, असे आवाहन पपई उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.