नंदुरबार - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण समाधानकारक आहे. सोमवारी दिवसभरात सात नवीन रुग्णांची नोंद झाली असून या नंदुरबार शहरातील सहा व शहाद्यातील एका महिलेचा समावेश आहे. नंदुरबार शहरातील एका 60 वर्षीय कोरोनाबाधित वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 25 वर गेली आहे. दरम्यान काल एकाच दिवशी 9 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 487 जणांना कोरोनाची लागण झाली असून 307 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
नंदुरबार शहरातील गणेश नगरच्या एका 60 वर्षीय पुरूषावर नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 25 झाली. काल पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये हरीओम नगरातील 75 वर्षीय महिला, नंदनगरी सोसायटीतील 55 वर्षीय पुरूष, आर. के. सिटीतील 50 वर्षीय पुरूष, कोकणी हिल परिसरातील 30 वर्षीय पुरूष, परदेशीपुरा भागातील 35 वर्षीय महिला, स्वराज नगरातील 58 वर्षीय महिला आणि शहादा नगरपालिका क्षेत्रातील एका 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकाच दिवशी सात बाधितांची भर पडल्याने एकूण रूग्णांची संख्या 487 झाली.
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून नंदुरबार व शहादा शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहेत. या दोन्ही शहरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक असून तालुकानिहाय नंदुरबार तालुक्यात 310 रूग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 206 रूग्ण बरे झाले आहेत. तर 79 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. नंदुरबार तालुक्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. शहादा तालुक्यात 120 रूग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 60 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित 53 रूग्णांवर उपचार सुरू असून तालुक्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.