नंदुरबार - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, याचा गैरफायदा घेत आंतरराज्य गुटख्याची तस्करी करणारे सक्रीय झाले आहे. नवापूर पोलिसांनी कारवाई करत 50 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला.
नवापूर-सुरत महामार्गावर जीवनावश्यक साहित्याच्या नावाखाली अवैधरित्या गुटखा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून महामार्गावरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच.31 सी.बी. 8837 ची तपासणी केली. त्यामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळले. हा सर्व माल तांदळाच्याखाली लपवण्यात आला होता. या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूरचे पोलीस निरीक्षक विजययसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, धीरज महाजन आणि पथकाने केली.
या कारवाईमुळे गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट असल्याची बाब उघड झाली आहे. गेल्याच आठवड्यात गुजरात पोलिसांनी नवापूर-सुरत महामार्गावर आयशर टेम्पो आणि पिकअपमध्ये होत असलेली तस्करी उघड केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक धीरज महाजन आणि सहकारी करत आहेत.