नंदुरबार - गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेला जिल्हा पोलीस दलाचा विश्वासू साथी श्वान पथकातील 'टिपू'चे आजारपणामुळे काल निधन झाले. जिल्हा पोलीस दलाच्या कवायत मैदानावर शासकीय इतमात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. टिपूने पोलीस दलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. पोलीस खात्यात त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही, असे मत त्याचा सांभाळ करणारे गोविंद नाईक व भीमसिंग पाडवी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, हजारो क्विंटल धान भिजले
2013 साली प्रशिक्षण घेऊन टीपू नंदूरबार पोलीस दलात दाखल झाला होता. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात टीपू गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनला होता. 300 पेक्षा अधिक गुन्ह्यात टिपूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरोड्यासह चोरी, खून प्रकरणात टिपूने यशस्वी कामगिरी केली होती. टिपूच्या कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर दोन वेळा सूवर्ण पद तर रौप्य पदाकाने त्याला गौरविण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वी त्याला अचानक काहीतरी त्रास होत असल्याचे आढळून आले. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला. नंदुरबार पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणावर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी टिपूच्या पार्थिवावर पुष्पचक्र अपर्ण करून सलामी दिली. त्यानंतर दफनविधी करण्यात आला. पोलीस कर्मचार्यांनी तीन फैरी फायर करून टिपूला सलामी दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सिताराम गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वषेन शाखेचे किशोर नवले, श्वान पथकातील पीएसआय सुजित डांगरे, दाभाडे यांनी शोक परेड केली. पोलीस मुख्यालयातील गोविंद गावीत व भिमसिंग गावीत हे टिपुचे प्रशिक्षक होते.