नंदुरबार- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्रामगृहात चोरी करणार्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 48 तासांत ही कारवाई केली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. चोरींचे प्रमाण वाढल्याने पोलिसांपुढे गुन्हा उघडकीस आणून चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते. दरम्यान, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्रामगृहात दि.16 डिसेंबर 2019 ला रात्री चोरी झाली होती. चोरट्यांनी 5 लोखंडी पलंग व तीन गाद्या लंपास केल्या होत्या. या चोरीप्रकरणी नंदुरबार बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांच्या तक्रारीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्रामगृहातील चोरीप्रकरणी संशयित आरोपी नंदुरबार बसस्थानक परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली. नवले यांनी तत्काळ पथकाला बसस्थानकाकडे रवाना केले. तपास पथकाने संपूर्ण बसस्थानकाचा परिसर पिंजून काढला.
सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास नंदुरबार बसस्थानकासमोर असलेल्या मैदानाच्या भींतीच्या आडोश्याला दोन संशयित युवक उभे असल्याचे पथकाला दिसले. दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यावर संशय वाढला. त्यानंतर राहुल ग्यानदेव घासीकर, संतोष अर्जुन गुमाने (दोन्ही रा.कंजरवाडा) नंदुरबार या दोघांना ताब्यात घेण्यात आले. विश्रामगृहात आपणच चोरी केली असल्याचे त्यांनी तपासात सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती गोदामाच्या पडक्या जागेत लपवून ठेवण्यात आलेले पाच पलंग व तीन गाद्या असा ऐवज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुन्हा घडल्यापासून अवघ्या 48 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून चोरट्यांना जेरबंद केले आहे. या आरोपींवर यापूर्वीही नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चोरीचे व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पो.कॉ.राकेश मोरे, प्रमोद सोनवणे, तुषार पाटील, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांनी ही कारवाई केली.