नंदुरबार - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही मतदार केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होती. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया लांबलेली पाहायला मिळाली.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र राज्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मावळ, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, शिरूर आणि शिर्डी अशा १७ मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात विवीपॅड आणि ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान उशिरा सुरू करण्यात आले. १००० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रावर सायंकाळी ६ नंतर तर नवापूर तालुक्यातील सोनपाडा मतदान केंद्रावर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान चालू होते. तर ३०८ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
एवढे असले तरी मतदानाला लोकांचा मोठा उत्साह पहायला मिळाला. सोनपाडा मतदान केंद्रात एकूण ११५४ मतदारांपैकी १०३१ मतदारांनी आपला हक्क बजावला. तर बर्डीपाडा केंद्रावर ११४७ पैकी ९८४ मतदारांनी आपला हक्क बजावला. नंदुरबारमध्ये सर्वाधिक म्हणजे ६७.६४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी नंदुरबार चौथ्या टप्प्यातील राज्यातील सगळ्यात जास्त मतदान झालेला लोकसभा मतदारसंघ सिद्ध झाला आहे.