नंदुरबार - आघाडी सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकार हे अधिक मजबूत आणि एकसंघ असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे निवडक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अनिल देशमुख म्हणाले, की हे सरकार पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपाचे काही लोक हे सरकार पडेल अशा निराधार चर्चा घडवून आणत आहेत, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ खडसे यांच्यामुळे उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. गट-तट बाजूला ठेवून पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या. अनिल देशमुख यांच्या या भेटीदरम्यान एकनाथ खडसे हे त्यांच्या सोबत होते. एकाच वाहनातून या दोन्ही नेत्यांनी हा संपूर्ण दौरा पूर्ण केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, कार्याध्यक्ष सागर तांबोळी, उदेसिंग पाडवी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता; 100 विद्यार्थ्यांना प्रवेशास परवानगी