नंदुरबार - नवापूर तालुक्यातील दुधवे गावात वनविभागाने चार घरांमध्ये चाललेल्या अवैध लाकूड व्यवसायावर छापा टाकत नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुधवे गावात चिंचपाडा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
दुधवेत अवैध लाकूडतस्करी व्यवसाय जोमात
नवापूर तालुक्यात दुधवे गावात अवैध लाकूड तस्करी व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. या कारवाईत संदीप वळवी, दशरथ वसावे, रोहिदास पाडवी, विरजी वळवी (सर्व रा. दुधवे, ता. नवापूर) यांचा घराची झडती घेतली असता साग नग ४४८, सिसम नग १० सोफा, पलंग नग असे एकूण अंदाजे ७ ते ८ घनमीटर साइज, गोल व फिनिश टिंबर माल व एक रंधा मशीन मिळून आला. सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत ८ ते ९ लाख रुपये आहे. सातत्याने अवैध लाकूडतस्करी, वाहतुकीसंदर्भात सातत्याने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दोन-तीन महिन्यांनंतर केलेली ही मोठी कारवाई आहे.
अवैधरित्या फर्निचर बनविण्याचे कारखाने सुरू
दूधवे गावातून चार ठिकणी अवैधरित्या लाकूडतस्करी करून फर्निचर बनविण्याचे अवैध कारखाने सुरू होते. यात सागवानी, सिसम, शिवण या प्रजातीचे लाकूड इमारती, चौफट नग, गोल नग तयार झालेले फर्निचर, रंदा मशीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने वनतस्करांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत ५० वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. साधारणत: पाच गाडीत लाकूड भरून नवापूर वन आगारात पंचनामा करून माल जमा करण्यात आला. या कारवाईत नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा, शहादा गस्ती पथकाचा समावेश होता.
'या' पथकाने केली कारवाई
मुख्य वनसंरक्षक धुळे दि. वा. पगार, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग एस. बी. केवटे शहादा, उमेश वावरे, विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय पवार, सहायक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा (प्रादेशिक व वन्यजीव) आर. बी. पवार वनक्षेत्रपाल (प्रा नवापूर, वनपाल डी. के. जाधव, विजय तेले, युवराज भाबड, एस. एन. पाटील, पी. डी. पवार, आरती नगराळे, सर्व वनरक्षक, वनमजूर, वाहन चालक विसरवाडी पोलीस कर्मचारी महादेव गुठे, मनिंदर नाईक यांनी केली.
टोल फ्री
वन व वन्यजीव तसेच अवैध वाहतूक लाकूड संबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ टोल फ्री नंबर १९२६वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांच्याकडून करण्यात आले आहे.