नंदुरबार - रक्ताचे नमुने भरलेले टेस्टट्युब तसेच वापरण्यात आलेल्या सीरिंज नंदुरबार शहरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सदर टेस्टट्युबमध्ये रक्ताचे नमुने भरलेले होते. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत शेकडो रक्ताचे टेस्टट्युब तसेच सीरिंज अज्ञाताने मोकळ्या जागेवर फेकून दिल्या आहेत.
शहरातील जुना बैलबाजार परिसरातील एका मोकळ्या जागेत अज्ञाताने प्लॅस्टिकच्या पिशवीत रक्ताचे नमुने भरलेले टेस्टट्युब तसेच वापरण्यात आलेल्या सिरींज फेकून दिल्या. काही वेळातच जुना बैलबाजार परिसरातील रहिवाशांच्या लक्षात सदर प्रकार आल्यानंतर त्यांनी तत्काळ नंदुरबार पालिकेला या घटनेची माहिती दिली. नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य कर्मचार्यांनी तत्काळ फेकलेले रक्ताचे टेस्टट्युब तसेच सिरींज गोळा करुन ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने घातक असणार्या रक्ताचे नमुने भरलेले टेस्टट्युब तसेच वापरण्यात आलेल्या सिरींज उघड्यावर फेकण्यात आल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. असे असले तरी सदर टेस्टट्यूब व सिरींजचा साठा कोणी उघड्यावर फेकला, तसेच सदर साठा कुठल्या लॅबमधून तपासणी होवून आला आहे, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहे. उघड्यावर फेकण्यात आलेल्या या साठ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. प्लॅस्टिकच्या पिशवीत युनीपत स्पेशालिटी लॅबोरेटरी अहमदाबाद व सुरत असे स्टिकर्स आढळून आले आहेत. त्यामुळे फेकण्यात आलेले रक्ताचे टेस्टट्यूब तसेच सिरींजचा साठा या लॅबमधून तपासणी होऊन आला का, याबाबत शोध घेण्यात येत आहे.