नंदुरबार - शहरातील एका पोल्ट्री फार्ममध्ये 10 ते 15 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना खड्यात पुरण्यात आल्याची माहिती निनावी तक्रारीवरून तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. कोंबड्या बर्ड फ्लूने की, राणीखेत आजाराने दगावल्या हे प्रयोगशाळा अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. मात्र, शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.
एका पोल्ट्री फार्ममध्ये सहा ते सात शेड आहेत. प्रत्येक शेडमधील १०० ते सव्वाशे कोंबड्या व कोंबड्यांची पिल्ली मृत्युमुखी पडत आहेत, असे जवळजवळ दोन आठवड्यांपूर्वीपासून रोज ७०० ते ८०० कोंबड्या मृत्युमुखी पडत आहेत, असे संबंधित कुक्कुटपालन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मृत्युमुखी कोंबड्यांचे अवयव प्रशासनाने भोपाळ येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दररोज कोंबड्याच्या मृत्युमुळे खळबळ
एका पोल्ट्री फार्ममध्ये सहा ते सात शेड आहेत. प्रत्येक शेडमधील शंभर सव्वाशे कोंबड्या आणि पिल्ली मृत्युमुखी पडत आहेत, असे जवळजवळ दोन आठवड्यांपासून रोज सातशे-आठशे कोंबड्या मृत्युमुखी पडत आहेत, असे संबंधित कुक्कुटपालन व्यवसायिकांचे म्हणणे आहे. कोंबड्या मरत आहेत, मात्र बर्ड फ्लू आजाराने मरत नाहीत, असे पंचनामा करणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोंबड्यांचा अहवाल आल्यावर निदान स्पष्ट होईल, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
बर्ड फ्ल्यूचा धोका नाही - आयुब बलेसरीया
२००६ मध्ये आलेल्या बर्ड फ्ल्यू कुक्कुटपालन व्यवसायिकांना खुप काही शिकवून गेला. गेल्या चौदा वर्षांपासून आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसाय २००६ च्या तुलनेत फक्त चाळीस टक्केच सुरू आहे. सद्या तेरा ते चौदा पोल्ट्री फार्म कार्यरत आहेत. तालुक्यातील कुठल्याही पोल्ट्री फार्मवरील पक्षांना एच -५ , एन -१ ची लागण झालेली नाही. कुठलाही पक्षी या आजाराने बाधित नाही तरी आम्ही पशुवैद्यकीय विभागाशी सतत संपर्कात राहून योग्य ती काळजी घेत आहोत असे पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफभाई बलेसरिया यांनी सांगितले. बर्ड फ्ल्यू चे वृत्त समजताच येथील पोल्ट्री असोसिएशन व व्यवसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी या आजाराबाबत दुजोरा दिला नाही.
2006 च्या बर्ड फ्लूनंतर पोल्ट्री चालकांकडून दक्षता
तालुक्यात तेरा ते चौदा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू आहेत. २००६ मध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती. तेव्हापासून कुक्कुटपालन व्यावसायिकांनी कोंबड्यांना एच-५ , एन-१ ची लागण होऊ नये यासाठीही खबरदारी घेतलेली आहे. त्यामुळे सध्य परिस्थिती कुठल्याही पक्षाला झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कुठेही पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला तर जिल्हा प्रशासनाला काळविण्याचे आदेश देण्यात आले होते. या बाबतीत नवापूर शहरातील कुक्कुटपालन व्यावसायिकांनी माहिती लपवली आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
2006 ची पुनरावृत्ती नको - पोल्ट्री फार्म मालक
नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूची लागण २००६ मध्ये झाली होती. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सर्व पक्षी मारून बुजण्यात आले होते. त्यावेळेस तालुक्यातील तीस-पस्तीस कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला होता. त्यावेळेस तीस ते पस्तीस कोटींचे नुकसान झाले होते.
अद्याप कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे नाहीत - तहसीलदार
नवापूर तालुक्यात अद्यापही कोंबड्यांना लक्षणे दिसून येत नाहीत. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसून येत आहेत. याबाबत आमच्याकडे भोपाळचा अहवाल आहे. यात भारतातील कुठल्याही पोल्ट्रीतील कोंबडीला लागण झाल्याचे दिसून आलेले नाही. परंतु, भीतीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. पशुसंवर्धन विभागातील तज्ञांशी संपर्क केला आहे, असे नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले. नवापूर शहरालगतच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांच्या अकस्मात मृत्यू होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मंडळ अधिकारी, नवापूर यांच्यामार्फत तपासणी केली असता सदरचे मृत्यू हे राणीखेत या आजारामुळे होत असल्याचे पोल्ट्री चालकाने सांगितले आहे. याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, नवापूर यांना सर्व पोल्ट्री फार्मच्या तपासणी करून अहवाल सादर करण्याचे कळविले आहे. तरी नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.