नंदुरबार - सातपुड्याच्या दुर्गम भागातील नर्मदा काठावरील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाच्या वतीने मनिबेली, जामठी, गमन यासह चार ठिकाणी जीवन शाळा चालविल्या जातात. मात्र, या जीवन शाळांना मान्यता असून अन्नधान्य मिळत नाही. तसेच सर्व शिक्षण अभियानाचा लाभही मिळत नाही. शासनाकडून वह्या-पुस्तके मिळत नाहीत. गावातील अनेक मुले आजही उघड्यावर भरणाऱ्या जीवन शाळेतून शिक्षणाचे धडे घेत आहे.
हेही वाचा - बालदिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी साधला संवाद
जीवन शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी बालदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. प्रशासनातील अधिकारी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उशीर करत असल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मैदानी खेळांना सुरुवात केली. बालदिनी आपल्या हक्कांसाठी केलेल्या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आम्हाला जिल्हा प्रशासन आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या देऊ, असा निर्धार या बालकांनी केला.