नंदुरबार - दिवसेंदिवस नंदुरबार जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता रेड झोनकडे सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. नंदुरबार शहर व तालुक्यात कोरोनाचे 65 टक्के रूग्ण आढळले आहेत.
खबरदारी म्हणून जिल्हाधिकार्यांनी नंदुरबार शहरात प्रत्येक रविवारी कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. आज संचारबंदीचा पहिला रविवार असल्याने नंदुरबार शहरात कडक संचारबंदी लागू असणार आहे. या संचारबंदीकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. चार महिन्यांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असणार्या नंदुरबार जिल्ह्यात अवघ्या एक ते दीड महिन्यातच कोरोनाचे रूग्ण वाढल्याने आता जिल्हा ऑरेंज झोनमधून रेड झोनकडे वाटचाल करीत आहे. दररोज येणार्या अहवालांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत असून, एकाच दिवशी तब्बल 22 पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
संकटकाळात सेवा कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योध्यांनादेखील कोरोनाची लागण होत आहे. नंदुरबार जिल्ह्याने कोरोना रूग्ण संख्येत 247चा आकडा गाठला आहे. त्यापैकी 148 रूग्ण संसर्गमुक्त झाले असून, उर्वरित 81 रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच जिल्ह्यात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 166 आहे. त्यापैकी 103 रूग्ण बरे झाले आहेत. तर शहर व तालुक्यात 53 रूग्ण उपचार घेत असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार शहरात कोरोनाचे रूग्ण जास्त आढळत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी प्रत्येक रविवारी शहरात कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आज (12 जुलै) रविवार असल्याने नंदुरबार शहरात कडक संचारबंदी लागू असणार आहे. या संचारबंदीत दूध व वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी 9 वाजेपर्यंत मुभा असेल. तसेच रूग्णालयात जात असताना सोबत फाईल असणे आवश्यक आहे. संचारबंदी काळात विनाकारण शहरात फिरताना आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिला आहे.